Gujrati Shikshan Sanstha

Vazirabad, Nanded.
02462-243446, 243620

gujrati school

                                                              गुजराती शाळा

                 गुजरात राज्यातून व्यापाराच्या निमित्ताने महाराष्ट्रात आलेल्या गुजराती समाज बांधवांनी समाज कार्याने प्रेरित होऊन लावलेलं छोटसं रोपटं म्हणजेच गुजराती शिक्षण संस्थेची "गुजराती शाळा'' त्याच रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. मी आणि माझं घर एवढाच संकुचित विचार करणाऱ्या जगात परराज्यातून येऊन ज्ञानदानाचे पवित्र मंदिर उभारणाऱ्या समाजबांधवांना नांदेडवासियांचा मानाचा मुजरा. पूर्ण मराठवाड्यात आपल्या शैक्षणिक कार्याने दबदबा निर्माण करणाऱ्या गुजराती शाळेला सलाम. नांदेड वासियांची ज्ञानाची गरज ओळखून 1938 मध्ये ज्येष्ठ समाज बांधव एकत्रित येऊन त्यांनी गुजराती शाळेची स्थापना केली. प्रथमतः गुजराती भाषेतून शिक्षण सुरू करण्यात आले, परंतु काही काळातच मराठी भाषेतून शिक्षणाची दारे नांदेड वासियांना खुली करण्यात आली. निस्पृह वृत्तीने लावलेलं रोपटे अपार कष्टाने, जिद्दीने भरभराटीस यायला वेळ लागला नाही. गुजराती बांधवांतील समर्पण भावना, एकता, सच्चेपणा याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे गुजराती शाळा. शिक्षणाचे बाजारीकरण झालेल्या काळात गुजराती शाळा आपल्या सच्चेपणाचा, तेजस्वीतेचा, तत्परतेचा डामडौल सांभाळत दिमाखात उभी आहे, याच सर्व श्रेय गुजराती समाज बांधवांना आहे या शिक्षण संस्थेमध्ये कार्यकारिणीची निवड लोकशाही पद्धतीने होते. दर 03 वर्षांनी सभासद निवडले जातात प्रत्येक सभासदांच्या मनात अहोरात्र गुजराती शाळेला प्रगतीपथावर नेण्याची धडपड असते. त्यामध्ये त्यांचा स्वार्थ कुठेही आड येत नाही त्यामुळे गुजराती शाळा यशाची उत्तुंग शिखरे पादाक्रांत करत आहे. क्षेत्र कोणतेही असो त्यात गुजराती शाळा असणार यात शंकाच नाही. कोणतेही कार्य करत असताना ज्या बाबींचा विचार करावयास हवा तो म्हणजे मध्यवर्ती ठिकाणी असणारी इमारत जी वरचेवर मोठी व भव्यदिव्य होत आहे. भरपूर पाणीपुरवठा, शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, ग्राउंड या सर्व बाबींचा विचार केला गेला आहे. एवढेच नव्हे तर कोविड काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची आबाळ होऊ नये,म्हणून ताबडतोब ऑनलाइन शिक्षणासाठी 5 डिजिटल क्लासरूम ची निर्मिती करण्यात आली. लसीकरण असो वा कोविड टेस्ट करणे यासाठी गुजराती शिक्षण संस्था कधीच मागे नव्हती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे येथील कर्मचारी वर्ग "यथा राजा तथा प्रजा" या उक्तीप्रमाणे म्हणजेच मुख्याध्यापक, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी अतिशय उत्साहाने सचोटीने आपापली कर्तव्य पूर्ण करण्यात कोणतीही कसूर करत नाहीत. या सर्व कर्मधर्म संयोगाने गुजराती शाळेने नांदेड च्या वैभवात मानाचा तुरा खोवला आहे. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात कर्मचारी वर्गाने समाज बांधवाचे व नांदेडवासियांचे यांचे स्वप्न सार्थ ठरवले आहे. येथील प्रत्येक विद्यार्थी जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा, मेहनत या संस्काराची शिदोरी सोबत घेऊनच जगाच्या अफाट वाटेवर प्रवास करतो व आपल्या आयुष्यात यशस्वी होतो. कला, क्रीडा, विज्ञान या सर्वच क्षेत्रात गुजराती शाळेचे विद्यार्थी राज्य पातळीवर पोहोचले आहेत.

लेखिका -

सौ प्रेमला सूर्यकांत साकोळकर

सहशिक्षिका गुजराती प्राथमिक शाळा, नांदेड